( खेड )
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट परिसरात रविवारी पहाटे दुचाकीचा अपघात होऊन एक युवक जखमी झाला. जखमीला तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ४.५० वाजण्याच्या सुमारास खेडहून पुण्याकडे जाणारी एमएच १२ टीएम २४१८ क्रमांकाची दुचाकी कशेडी येथील वाहतूक पोलीस चौकीजवळ आली असता चालकाचा अचानक ताबा सुटल्याने अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थान, नाणिज धाम यांच्या २४ तास कार्यरत असलेल्या मोफत रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातात दुचाकीस्वार अविनाश बबन चिनकटे (वय ३०, रा. संगलट) जखमी झाले. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तत्परता दाखवत जखमीला त्वरित रुग्णालयात दाखल केले. पोलिसांकडून या अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.

