(रत्नागिरी / गुहागर)
रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्वर येथे पोस्टमनच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेली सुमारे दीड वर्षे नागरिकांचे टपाल वितरित न करणाऱ्या पोस्टमन करण थोरात याला अखेर सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून, त्याच्या घरातून तब्बल दोन पोती भरून टपाल जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेळणेश्वर पोस्ट कार्यालयात बीड जिल्ह्यातील करण थोरात हा पोस्टमन म्हणून कार्यरत होता. दरम्यान, अनेक नागरिकांच्या मोबाईलवर टपाल पोहोचल्याचे ट्रॅकिंग संदेश येत होते, मात्र प्रत्यक्षात टपाल घरी मिळत नसल्याने ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करण्यास सुरुवात केली.
या तक्रारी गांभीर्याने घेत नव्याने रुजू झालेले पोस्टमास्तर प्रसाद दिवाडकर यांनी थोरात याच्याकडे चौकशी केली. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी थेट त्याच्या घरी जाऊन पाहणी केली. या पाहणीत दोन पोती भरून प्रलंबित टपाल आढळून आले, ज्यामुळे एकच खळबळ उडाली.
जप्त करण्यात आलेल्या टपालांमध्ये बँकांच्या लिलाव नोटिसा, पासबुक, चेकबुक, आधार कार्ड, एटीएम कार्ड, एलआयसी प्रमाणपत्रे, तलाठी कार्यालयासाठी २०२४ मधील पत्रे, मुंबई विद्यापीठाची कागदपत्रे तसेच विविध महाविद्यालयीन पत्रव्यवहाराचा समावेश आहे. हा प्रकार २४ एप्रिल रोजी उघडकीस आला.
तालुका पोस्टमास्तर हिमांशू जोशी यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दरम्यान, वेळेत टपाल न मिळाल्यामुळे अनेक नागरिकांचे आर्थिक आणि प्रशासकीय नुकसान झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. मोजणी नोटिसा उशिरा मिळाल्याने काहींना अतिरिक्त शुल्क भरावे लागले, तर बँकांच्या लिलाव नोटिसा न मिळाल्यामुळे काहींच्या दागिन्यांचा लिलाव झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, आधार कार्ड आणि पॅनकार्ड वेळेत न मिळाल्याने अनेकांची महत्त्वाची कामे अडकली आहेत. या सर्व नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

