(अकोला)
अकोला शहरात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून तापमानाने धोकादायक पातळी गाठली आहे. आज अकोल्यात कमाल तापमान 46.9 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून, हे राज्यातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. किमान तापमान 27.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. ही माहिती भारतीय हवामान विभाग चे सहाय्यक वैज्ञानिक शुभम धुळेकर यांनी दिली.
विदर्भ प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत असून अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. विशेषतः अकोल्यात सकाळपासूनच उष्णतेची तीव्रता जाणवत असून दुपारी 12 नंतर रस्ते अक्षरशः ओस पडल्याचे चित्र दिसून आले.
गेल्या दोन दिवसांपासून अकोल्यात तापमान 45 अंशांच्या आसपास होते. मात्र आज ते थेट 46.9 अंशांवर पोहोचल्याने उष्णतेचा फटका अधिक तीव्र झाला आहे. प्रखर उन्हामुळे नागरिकांसह पशुपक्ष्यांचेही हाल होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. वाहन चालवताना डोक्यावर संरक्षण घेतले तरी उन्हाचे चटके जाणवत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
उष्णतेच्या तीव्रतेमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुकलेल्या काडी-कचऱ्याला अचानक आग लागून ती वेगाने पसरल्याची घटना तुकाराम चौक, मलकापूर रोड येथे घडली. या आगीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र एका वाहनाचे मोठे नुकसान झाले.
पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे काही दिवसांपूर्वी तापमानात घट झाली होती, मात्र आता पुन्हा तापमान झपाट्याने वाढत आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खालील काळजी घेण्याचे आवाहन केले आहे:
- दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणे टाळा
- जास्त शारीरिक श्रम टाळा
- भरपूर पाणी प्या
- लहान मुले व पाळीव प्राणी बंद वाहनात ठेवू नका
- ज्वलनशील वस्तूंपासून दूर राहा
- हलके व सैल कपडे वापरा
- लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्या
अकोल्यातील वाढत्या तापमानामुळे परिस्थिती गंभीर बनत असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यावश्यक झाले आहे.

