(मुंबई)
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा बहुप्रतिक्षित प्रकल्प पूर्णत्वास आला असून, याचे उद्घाटन 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून ही माहिती दिली. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार असून, सुमारे 25 ते 30 मिनिटांची वेळ वाचणार आहे. खोपोली ते कुसगावदरम्यान उभारण्यात आलेल्या या नव्या मार्गामुळे घाटातील वळणावळणाचा आणि वाहतूक कोंडीचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
13.3 किमी लांबीच्या या प्रकल्पात आधुनिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळतो. यात
- 850 मीटरचा व्हायाडक्ट
- 1.75 किमी आणि 8.9 किमी असे दोन बोगदे
- सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो.
- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या मिसिंग लिंकचे बांधकाम केले आहे.
- ७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण
- लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे.
- मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक पूर्णपणे बायपास होणार
- मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ सुमारे २० ते ३० मिनिटांनी कमी होईल.
- इंधनाची बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणात लक्षणीय घट होण्यास मदत
टायगर व्हॅलीतील भव्य पूल ठरणार आकर्षण
टायगर व्हॅली, लोणावळा परिसरातील केबल-स्टेड पूल हा या प्रकल्पाचा मुख्य आकर्षण आहे. सुमारे 180 मीटर उंच टॉवर्स असलेला हा पूल भारतातील सर्वात उंच रस्ते केबल-स्टेड पूल मानला जातो. या पुलाचे बांधकाम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने केले आहे.
या मार्गावर जवळपास 9 किमी लांबीचा बोगदा असून, तो डोंगर फोडत आणि लोणावळा परिसराखालून जातो. धुके, पाऊस आणि वेगवान वारे अशा प्रतिकूल परिस्थितीतही हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे. सध्या 19.8 किमीचा घाटमार्ग या प्रकल्पामुळे 6 किमीने कमी होणार आहे. नव्या 4-लेन कॉरिडॉरमुळे वाहतुकीची क्षमता वाढणार असून, अपघातांचे प्रमाणही घटण्याची शक्यता आहे. हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प महाराष्ट्राच्या पायाभूत विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक प्रकल्प अखेर 1 मेपासून सुरू होणार असून, यामुळे मुंबई-पुणे प्रवास सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार आहे. हा प्रकल्प केवळ वाहतुकीसाठी महत्त्वाचा नाही, तर त्यामागची ‘मिसिंग लिंक’ ही संकल्पना देखील तितकीच रंजक आहे.
‘मिसिंग लिंक’ नाव का पडलं?
2001 साली मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग उभारताना मूळ आराखड्यात खोपोली ते कुसगाव (भुसगाव) दरम्यान सरळ मार्ग, बोगदे आणि पुलांद्वारे जोडण्याची योजना होती. मात्र विविध तांत्रिक आणि पर्यावरणीय कारणांमुळे हा भाग पूर्ण होऊ शकला नाही. त्याऐवजी लोणावळा-खंडाळा घाटमार्गाचा समावेश करण्यात आला. त्यामुळे मूळ आराखड्यातील हा भाग ‘मिसिंग’ राहिला आणि त्यावरूनच या प्रकल्पाला ‘मिसिंग लिंक’ असे नाव देण्यात आले. कालांतराने या अपूर्ण भागाला मंजुरी मिळाल्यानंतर ऑगस्ट 2018 मध्ये प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. सुरुवातीला डिसेंबर 2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
कामात आलेल्या अडचणी
प्रकल्पाच्या कामादरम्यान अनेक अडचणी आल्या.
- कोविड-19 महामारीमुळे कामात खंड
- खंडाळा घाट परिसरातील मुसळधार पाऊस
- वेगवान वारे आणि कठीण भौगोलिक परिस्थिती
या सर्व कारणांमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाला. हा प्रकल्प म्हणजे 2001 मध्ये अपूर्ण राहिलेल्या योजनेची पूर्तता असून, महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये एक मोठी भर मानली जात आहे.

