(रत्नागिरी / तुषार पाचलकर)
शहरात प्रतिबंधित गुटखा व पान मसाला विक्रीसाठी येणाऱ्या इसमावर रत्नागिरी शहर पोलिसांनी पहाटे धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एकूण सुमारे ६ लाख ८७ हजार रुपयांचा माल व वाहन पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथून एक इसम मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व पान मसाला विक्रीसाठी रत्नागिरीत येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला.
पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पहाटे कारवाई करत संशयित वाहन अडवले. तपासणीदरम्यान वाहनातून प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा मोठा साठा आढळून आला. या प्रकरणी शरद गणपती भंडारे (रा. सरूड, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सुमारे ३.२७ लाख रुपये किमतीचा गुटखा-पान मसाला व ३.६० लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत.

