(देवरुख / सुरेश सप्रे)
देवरुख येथे लग्नसमारंभ आटपून परतणाऱ्या हातखंबा येथील तरुणांच्या दुचाकीचा पांगरी येथील धोकादायक वळणावर आज रविवारी सुमारे दीड वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेमुळे हातखंबा व कांबळे वाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातखंबा येथील तीन तरुण देवरुख येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. समारंभ आटपून परत येत असताना पांगरी येथील अवघड वळणावर दुचाकीवरील चालकाचा ताबा सुटला. नियंत्रण सुटल्याने दुचाकी समोरील कठड्यावर आदळली आणि त्यातील एक जण दरीत कोसळून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला.
या अपघातात विकास काशीराम कांबळे (वय ३८, रा. हातखंबा) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर सुमित विलास कांबळे (वय ३५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विलास चंद्रकांत कांबळे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. रुग्णवाहिकेने जखमी व मृतांना जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले.
रत्नागिरी पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. ऐन लग्नसराईच्या काळात घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

