(लांजा)
तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील रामवाडी परिसरात गावच्या सरपंच महिला आणि ग्रामसेवकावर हल्ला केल्याची घटना बुधवारी (२९ मे) दुपारी सुमारे २.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्नेहा संतोष भिंगार्डे (वय ५४), कुणाल संतोष भिंगार्डे (वय २५) आणि माधव शंकर कोळवणकर (वय ६२) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून, हे तिघेही वेरवली बुद्रुक येथील रहिवासी आहेत. फिर्यादी सरपंच महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आणि त्यांच्यासोबत असलेले ग्रामसेवक राम मंदिर परिसरातील एका डांबरी रस्त्याचे अतिक्रमण हटवून तो नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम करीत होते. याच वेळी वरील तिघांनी त्यांना अडवून शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. आरोपींनी सरपंच व ग्रामसेवकास धक्काबुक्की करत दगड लावून रस्ता पूर्णपणे बंद केल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लांजा पोलिस ठाण्यात संबंधित तिघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.