(चिपळूण /प्रतिनिधी)
शहरातील पाग येथील गोपाळकृष्णवाडी परिसरात जमिनीच्या वादातून एका ज्येष्ठ रिक्षाचालकाला चौघांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
गजानन विठोबा किंजळकर (वय ६७, व्यवसाय रिक्षाचालक, रा. गोपाळकृष्णवाडी, पाग, चिपळूण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांचा आणि आरोपींचा जमिनीच्या कारणावरून दीर्घकाळ वाद सुरू होता. संबंधित जागेवर आरोपी कोणतीही पूर्वसूचना न देता मोजणी करत असल्याचे पाहून किंजळकर यांनी किसन काशीराम भुवड यांच्याकडे विचारणा केली.
या वेळी झालेल्या वादातून संतप्त झालेल्या किसन भुवड यांनी शिवीगाळ करत किंजळकर यांना हाताने तसेच दगडाने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर संजय ऊर्फ बंड्या किसन भुवड, वैभव किसन भुवड आणि विश्वास भुवड हेही घटनास्थळी दाखल झाले. चौघांनी संगनमताने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी संजय भुवड याने ‘एकटाच भेटला आहे, याला तुडवा, सोडू नका, ठार मारा,’ अशी धमकी दिल्याचाही उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.
या मारहाणीत किंजळकर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून चिपळूण पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

