(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील टिके-भातडेवाडी येथे एका ४१ वर्षीय प्रौढाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. सततचे आजारपण आणि दारूच्या व्यसनामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मंगेश तुकाराम कांबळे (वय ४१, रा. टिके-भातडेवाडी, ता. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या काही काळापासून ते आजारपणामुळे त्रस्त होते. त्यातच दारूच्या व्यसनाने त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती अधिकच खालावल्याचे सांगितले जाते. दि. २१ एप्रिल रोजी रात्री ९ ते दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ७ या कालावधीत त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती पुढे आली. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली.
या घटनेची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

