(चिपळूण)
चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उमेश धोंडीराम सकपाळ यांनी चिपळूणकरांच्या विश्वासाला मानाचा मुजरा करत सर्व मतदार व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या सामाजिक कार्याला जनतेने दिलेला हा कौल मोलाचा असून, चिपळूणचा सर्वांगीण विकास आणि स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराची वाटचाल घडवून आणणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना सकपाळ म्हणाले की, नागरिकांनी दाखवलेला विश्वास व प्रेम हीच माझी खरी ताकद आहे. नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणींमध्ये सातत्याने धावून जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला असून, त्यालाच आज जनतेची मान्यता मिळाल्याचे समाधान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक काळात अपप्रचार, खोटे आरोप तसेच जात-पात आधारित राजकारण झाले असतानाही नागरिकांनी विकास आणि विश्वासालाच प्राधान्य दिले, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पुढील काळात रखडलेले विकासप्रकल्प मार्गी लावणे, नागरी सुविधा सक्षम करणे तसेच चिपळूणचा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जपणे हे आपले प्राधान्य राहील, असे त्यांनी सांगितले.
“चिपळूणकरांनी दिलेला सन्मान आणि विश्वास कधीही कमी पडू देणार नाही. मी, माझे कुटुंब, माझा पक्ष आणि महायुतीचे सर्व नगरसेवक २४ तास जनतेच्या सेवेत तत्पर राहतील,” असे आश्वासन देत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी पुन्हा एकदा नागरिकांचे आभार मानले.
या निवडणुकीत भाजपचे नेते प्रशांत यादव, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.
समन्वय समिती स्थापन करण्याची घोषणा
नगरपालिका प्रशासन आणि चिपळूणवासीयांमध्ये सातत्यपूर्ण समन्वय राखण्यासाठी स्वतंत्र समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, या समितीत राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी सहभागी असतील. कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय ही समिती चिपळूणच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक व सल्लागार म्हणून कार्य करेल.
नागरी प्रश्न, विकास प्रकल्प, मूलभूत सुविधा आणि भविष्यातील नियोजन याबाबत नागरिकांचे मत व तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रशासनापर्यंत पोहोचवणे हा या समितीचा मुख्य उद्देश राहील. जनता आणि प्रशासन यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून ही समन्वय समिती कार्यरत राहील, असा विश्वासही उमेश सकपाळ यांनी व्यक्त केला.
विविध प्रभागांतून विजयी झालेल्या उमेदवारांमुळे चिपळूण नगरपालिकेत महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
नगराध्यक्षपदासह सर्व १४ प्रभागांतील विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे
नगराध्यक्ष – श्री. उमेश धोंडीराम सकपाळ. प्रभाग क्रमांक १ जागा अ – नाखुदा मिसबा अजगर, जागा ब – जुळे उदय विठ्ठल. प्रभाग क्रमांक २ जागा अ – सौ. सफा दिलबर गोटे, जागा ब – सरगुरोह साजिद हनीफ खान. प्रभाग क्रमांक ३ जागा अ – दांडेकर रूपाली राकेश, जागा ब – बुरटे प्रमोद सुभाष. प्रभाग क्रमांक ४ जागा अ – अजय पांडुरंग भालेकर, जागा ब – वैशाली विलास कदम. प्रभाग क्रमांक ५ जागा अ – कोवळे निहार हेमंत, जागा ब – नसरीन खडस. प्रभाग क्रमांक ६ जागा अ – निमकर वैशाली मधुकर, जागा ब – गोताड संजय चंद्रकांत. प्रभाग क्रमांक ७ जागा अ – भिसे संदीप अशोक, जागा ब – हर्षली संदेश पवार. प्रभाग क्रमांक ८ जागा अ – वांगडे साईनाथ नजीर, जागा ब – योगेश जगन्नाथ पवार. प्रभाग क्रमांक ९ जागा अ – अंजली सतीश कदम, जागा ब – मोदी शशिकांत श्रीकांत. प्रभाग क्रमांक १० जागा अ – देवळेकर रसिका रत्नदीप, जागा ब – विक्रांत उर्फ कपिल विठ्ठल शिर्के. प्रभाग क्रमांक ११ जागा अ – नीलम सीताराम जाधव, जागा ब – अंकुश आवले. प्रभाग क्रमांक १२ जागा अ – उमा उदय देसाई, जागा ब – पिसे शुभम दयानंद. प्रभाग क्रमांक १३ जागा अ – गणेश आग्रे, जागा ब – महाडिक पल्लवी मोहन. प्रभाग क्रमांक १४ जागा अ – शिंदे कांचन सुमित, जागा ब – मिथिलेश विकी नरळकर.
निकाल जाहीर होताच शहरात जल्लोषाचे वातावरण असून, विकासाभिमुख व पारदर्शक प्रशासनाच्या अपेक्षा नवनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडून व्यक्त केल्या आहेत.
शिवसेना शिंदे गट : ९
भाजप : ७
शिवसेना ठाकरे गट : ५
काँग्रेस : ३
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट : २
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट : २

