(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्ह्यातील विविध मार्गांवर अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. यावर्षी जानेवारी ते मार्च २०२६ या अवघ्या तीन महिन्यांतच जिल्ह्यात १०१ अपघातांची नोंद झाली असून, यात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०३ जण किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांचे प्रमाण वाढल्याने प्रशासनासह नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षभरात जिल्ह्यात एकूण ३५१ अपघात झाले होते. यात १३३ जणांना जीव गमवावा लागला, तर ४८५ जण जखमी झाले होते. विशेष म्हणजे, यंदाच्या केवळ तीन महिन्यांतच एकूण वार्षिक अपघातांपैकी तब्बल २९ टक्के अपघात घडले आहेत. यावरून परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट होते. महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. चालू वर्षातील १०१ अपघातांपैकी ५४ अपघात राष्ट्रीय महामार्गावर, १४ राज्य महामार्गावर, तर ३३ अपघात इतर मार्गांवर घडले आहेत. मागील वर्षातही ३५१ अपघातांपैकी १४६ अपघात राष्ट्रीय महामार्गावर, २६ राज्य महामार्गावर आणि १७९ अपघात अन्य मार्गांवर झाले होते.
वाहनांची वाढती संख्या, वेगाचे वाढते आकर्षण, पुढे जाण्याची घाई, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आणि वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत. महामार्गांचे चौपदरीकरण सुरू असल्याने अनेक ठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीतही काही वाहनचालक वेगावर नियंत्रण ठेवत नसल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. विशेषतः तरुणांमध्ये वेगाची स्पर्धा जीवघेणी ठरत असल्याचे चित्र आहे. वाहतूक नियमांकडे दुर्लक्षही अपघातांना कारणीभूत ठरत आहे. अचानक लेन बदलणे, चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणे, सिग्नल व सूचना फलकांकडे दुर्लक्ष करणे या बाबी अपघातांना चालना देत आहेत. याशिवाय अति वेग व अति घाई हेही गंभीर कारण ठरत आहे. वेळेवर पोहोचण्याच्या नादात वेगावर नियंत्रण न ठेवल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे.
लांब पल्ल्याच्या प्रवासात चालकाचा थकवा आणि डुलकीही अपघातांचे महत्त्वाचे कारण बनत आहे. पहाटेच्या सुमारास किंवा दुपारच्या जेवणानंतर येणारी झोप, तसेच सतत वाहन चालवल्याने होणारा थकवा दुर्लक्षित केल्याने अपघात घडतात. विश्रांती न घेता प्रवास सुरू ठेवल्यास अनर्थ ओढवण्याची शक्यता वाढते. दरम्यान, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आणि थकवा जाणवल्यास विश्रांती घेणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सुरक्षित प्रवासासाठी जागरूकता हाच एकमेव उपाय असल्याचे अधोरेखित होत आहे.

