(रत्नागिरी)
जयगड समुद्रात मध्यरात्री राबवलेल्या धाडसी कारवाईत मत्स्यव्यवसाय विभागाने अवैध एलईडी मासेमारी करणाऱ्या तीन नौका जप्त केल्या आहेत. प्रतिकूल हवामान, जोरदार वारे आणि उग्र लाटांचा सामना करत केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण किनारपट्टीवर खळबळ उडाली आहे.
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अवैध मासेमारीविरोधात कडक भूमिका घेतल्यानंतर विभागाने ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जयगड परिसरात ‘मिडनाईट ऑपरेशन’ राबवण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या अंधारात एलईडी लाईटच्या साहाय्याने बेकायदा मासेमारी सुरू असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. गस्ती नौकेसाठी डिझेल उपलब्ध नसल्याची चर्चा पसरल्याने संबंधित मासेमार निर्धास्त झाले होते. मात्र, विभागाने गुप्त रणनीती आखत अचानक डिझेलची व्यवस्था केली आणि कोणतीही चाहूल लागू न देता गस्ती नौका जयगडच्या दिशेने रवाना केली.
सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ५ परवाना अधिकारी व सुरक्षा पथकाने मध्यरात्री समुद्रात धडक दिली. चिन्मय जोशी, पार्थ तावडे, स्वप्नील चव्हाण, दीप्ती साळवी, स्मितल कांबळे तसेच तुषार कर्गुटकर, विनायक शिंदे, सुजन पवार व साईनाथ साळवी या पथकातील सदस्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
कारवाईदरम्यान अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांना वेढा घालण्यात आला. यावेळी एका नौकेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने समुद्राच्या मध्यभागी सुमारे एक तास थरारक पाठलाग करत संबंधित नौकेला जेरबंद केले.
या कारवाईत इम्तियाज हाजी हसनमिया मुकादम यांची ‘H. Imtiyaz’ (IND-MH-4-MM-1961), लीना लक्ष्मण बिर्जे यांची ‘Lakshmi’ (IND-MH-4-MM-506) आणि अब्दुल लतीफ अली होडेकर यांची ‘Aqsa Imran’ (IND-MH-4-MM-1971) या तीन नौका जप्त करण्यात आल्या.
सदर नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (MMFRA) अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू असून अहवाल सहाय्यक आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. गस्ती नौका व ड्रोनच्या सहाय्याने रत्नागिरी जिल्हा अवैध मासेमारीविरोधी कारवाईत आघाडीवर असून, या मोहिमेमुळे बेकायदा मासेमारी करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

