(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मिऱ्या–नागपूर महामार्गावरील रत्नागिरी शहराच्या हद्दीत महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे वाहनचालकांची कसरत वाढली असतानाच, उनाड गुरांमुळे वारंवार अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. खड्डेमय रस्ता, उडणारी धूळ आणि रस्त्यावर मोकाट फिरणारी गुरे यांचा त्रास वाहनचालकांना गेल्या अनेक दिवसांपासून सहन करावा लागत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळेस अचानक रस्त्यावर बसलेली किंवा उभी असलेली गुरे वाहनांच्या प्रकाशझोतात नजरेत न आल्याने अनेकदा चालकांची नजर चुकत अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी हा महामार्ग धोक्याचा ठरत होता. या पार्श्वभूमीवर महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार रवी इन्फ्रा बिल्ड कंपनीने अखेर महत्त्वाच्या ठिकाणी सावधानतेचे फलक उभारले आहेत. ‘पुढे रस्त्यावर प्राणी बसलेले असू शकतात’ अशी सूचना देणारे हे बोर्ड लावून वाहनचालकांना वेग कमी ठेवण्याचे व खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फलक उभारल्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या गुरांच्या संख्येतही सध्या घट झाल्याचे चित्र आहे. फलकामुळे अपघातांचा धोका काही प्रमाणात कमी झाल्याचा दिलासा वाहनचालकांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, महामार्गावरील काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्त्यावरील सुरक्षितता वाढवावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.

