(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे किनारपट्टीवर सुरू असलेल्या डिझेल तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा सीमाशुल्क विभागाने भांडाफोड केला आहे. या कारवाईत तस्करीचे डिझेल विकणारी ‘रत्न माऊली’ ही बोट आणि डिझेल खरेदी करणारी आणखी एक बोट अशा दोन बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी बोटीचा मालक आणि तांडेल अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.
मध्यरात्री समुद्रात थरारक कारवाई
हर्णे किनारपट्टीवर काही बोटींकडून अवैधरित्या डिझेल विक्री होत असल्याची गोपनीय माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधीक्षक (P&I) अतुल व्ही. पोतदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २१ एप्रिल २०२६ रोजी रात्री विशेष शोधमोहीम राबवली.
हर्णे किनाऱ्यापासून सुमारे ११ नॉटिकल मैल अंतरावर ‘रत्न माऊली’ ही संशयास्पद बोट आढळून आली. २१ आणि २२ एप्रिलच्या मध्यरात्री ही बोट इतर बोटीला डिझेल विक्री करत असताना पथकाने रंगेहात पकडले.
३०० टनांहून अधिक डिझेलची तस्करी
पकडलेल्या दोन्ही बोटी दाभोळ जेटीवर आणून तपासणी करण्यात आली. बोटीतील कप्प्यांमध्ये साठवलेले मोठ्या प्रमाणात डिझेल जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात गेल्या दोन महिन्यांत ‘रत्न माऊली’ बोटीमार्फत तब्बल ३०० टनांहून अधिक डिझेलची तस्करी झाल्याचे उघड झाले आहे. या रॅकेटचे जाळे आणखी किती मोठे आहे, याचा तपास सुरू आहे.
आरोपींना पोलीस कोठडी
या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी विशेष सरकारी वकील शेखर डी. टोणपे यांनी न्यायालयात अर्ज केला होता. दापोली न्यायालयाने २४ एप्रिल २०२६ रोजी हा अर्ज मंजूर करत दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप कृष्णा यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, किनारपट्टीवर संशयास्पद हालचाली किंवा तस्करीची माहिती आढळल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा. तसेच माहिती देण्यासाठी ८७९६८९५९९० किंवा ८४२११८८७५० या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधता येईल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी लक्ष्मीकांत भाटकर यांनी दिली.

