(खेड/ रत्नागिरी प्रतिनिधी)
तालुक्यातील मेटे-मोहल्ला परिसरात घडलेल्या शफी अब्दुल्ला वरवटकर (वय ५५) यांच्या खूनप्रकरणी तब्बल १७ दिवस पोलिसांना चकवा देणाऱ्या तिघा आरोपींना अखेर पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. गुरुवारी (दि. २३ एप्रिल) सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास एसटी बसस्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली.
कादिर शमशुद्दीन घारे, गणी इस्माईल बोट आणि अशरफ महमूद बोट (तिघेही रा. मेटे-मोहल्ला, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनी ६ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास शफी वरवटकर यांच्यावर बेदम मारहाण केली होती. गंभीर जखमी झालेल्या वरवटकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशेष म्हणजे, वरवटकर यांची यापूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आरोपींना असतानाही हा अमानुष हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या घटनेप्रकरणी शेख अली हसन वरवटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून त्यांचा शोध सुरू होता; मात्र आरोपींचा ठावठिकाणा लागत नव्हता. दरम्यान, संबंधित आरोपी खेडमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एसटी बसस्थानक परिसरात कारवाई करत तिघांनाही अटक केली. या अटकेमुळे परिसरात समाधानाची भावना व्यक्त होत असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

