(रायगड)
जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) माणगाव येथे कार्यरत असलेल्या सहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. निलंबितांमध्ये उपनिरीक्षक अविनाश पाटील यांच्यासह बाबासो पिंगळे, वाघमोडे, सोंडकर, पहलकर आणि आंबले यांचा समावेश आहे.
माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद कंपनीतून माल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान काही मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मात्र, या जप्त मालाची अधिकृत नोंद माणगावऐवजी कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची गंभीर विसंगती उघडकीस आली. ही बाब समोर येताच वरिष्ठ पातळीवर खळबळ उडाली.
ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कठोर पाऊल उचलत संबंधित सहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. या कारवाईमुळे पोलीस यंत्रणेत शिस्त आणि पारदर्शकता राखण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आल्याचे मानले जात आहे.
या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बदलीनंतरही काही कर्मचारी हस्तकांच्या माध्यमातून बेकायदेशीर वसुली करत असल्याच्या तसेच एका कर्मचाऱ्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बारकाईने चौकशी सुरू असून, संपूर्ण घटनाक्रमाची तपासणी केली जात आहे. पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोषींवर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या कारवाईनंतर एलसीबीमधील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

