(रत्नागिरी / संगमेश्वर प्रतिनिधी)
तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात पुन्हा एकदा निष्काळजीपणाचा बळी गेला. साखरेची वाहतूक करणारा ट्रक रस्त्यालगतच्या खोल खड्यात कलंडून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (२४ एप्रिल) सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असून, महामार्गावरील सुरू असलेल्या कामांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमद रामशेर ताहीर हुसेन अन्सारी (वय ३६, रा. झारखंड) हे एमएच १० डीटी ४४०९ क्रमांकाचा ट्रक घेऊन फलटण येथून साखरेची पोती भरून जयगडच्या दिशेने निघाले होते. आंबा घाटातील धोकादायक वळणाजवळ महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असून, रस्त्याच्या कडेला कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसताना खोल खड्डा ठेवण्यात आला आहे. याच खड्ड्यात ट्रक कलंडल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेने स्थानिकांसह वाहनचालकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. महामार्गाचे काम सुरू असताना आवश्यक ती खबरदारी, किंवा रात्रीसाठी प्रकाशव्यवस्था का नाही? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
संबंधित ठेकेदाराने सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करत निष्काळजीपणाची परिसीमा गाठल्याचे दिसून येत आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, अशा घटना वारंवार घडत असतानाही महामार्ग प्राधिकरण विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. प्राधिकरणाचे अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत का? असा रोष व्यक्त होत असून, जबाबदारीची साखळी निश्चित करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

