(खेड)
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मंगळवारी दुपारी एक धक्कादायक आणि घाबरवणारी घटना घडली. मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ येथील खोपी फाटा परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी एका कारवर हल्ला करत परिसरात खळबळ उडवून दिली.
प्राप्त माहितीनुसार, दोन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून येत संबंधित कारचा पाठलाग केला. त्यांनी कार थांबवून तिच्यावर आधी दगडफेक केली आणि काचा फोडल्या. त्यानंतर त्यापैकी एका तरुणाने थेट बंदूक काढून हवेत गोळीबार केला. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकारामुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

