(मुंबई / वृत्तसंस्था)
राज्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांना वितरित करण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत सातत्याने तक्रारी होत असताना महिला व बालविकास विभागाने आता कठोर भूमिका घेतली आहे. अंगणवाड्यांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराची पुढील ४८ तासांत प्रत्यक्ष तपासणी करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. आहाराच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसून निकृष्ट किंवा खराब आहार आढळल्यास तो तात्काळ बदलून घेण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहणार आहे.
पुणे जिल्ह्यातील एका अंगणवाडी सेविकेने बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातील पांढरा वाटाणा आणि भरडा निकृष्ट असल्याचा दावा करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता. “९ ते १० शिट्ट्या काढूनही न शिजणारा पांढरा वाटाणा आणि शिजवूनही कच्चा राहणारा भरडा लहान मुलांना कसा खाऊ घालायचा?” असा सवाल अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी उपस्थित केला होता. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करून संबंधित निकृष्ट अन्नावर तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणानंतर संबंधित अंगणवाडी सेविकेवर प्रशासनाकडून कारवाई झाल्याची बाब समोर आली होती.
या पार्श्वभूमीवर आता महिला व बालविकास विभागाने बालकांच्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत व्यापक तपासणीचे आदेश दिले आहेत. राज्यातील बालकांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणणे आणि त्यांना सुरक्षित व दर्जेदार पोषण मिळणे याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या मुख्यसेविका आणि पर्यवेक्षिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाड्यांना पुढील ४८ तासांत प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पोषण आहाराची सखोल तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच विभागीय आयुक्त, जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासनानेही आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन आहाराच्या गुणवत्तेची खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अंगणवाडीत प्राप्त झालेला पोषण आहार योग्य, सुरक्षित आणि सुस्थितीत आहे की नाही, याची बारकाईने पडताळणी करणे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक राहणार आहे. तपासणीदरम्यान आहार अयोग्य, निकृष्ट किंवा खराब आढळल्यास संबंधित पुरवठादाराकडून तो तात्काळ बदलून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल.
दरम्यान, तपासणी मोहिमेनंतरही पोषण आहाराबाबत तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. आहाराच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आदिती तटकरे यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील अंगणवाड्यांमधील पोषण आहाराच्या गुणवत्तेवर आता प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे.

