(सातारा)
शहरात कोकेन तस्करीचा पर्दाफाश करत पाचगणी पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून दहा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कोकेनसदृश अंमली पदार्थ, दोन आलिशान चारचाकी वाहने व मोबाइल हँडसेट असा एकूण सुमारे ४२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्याचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी या प्रसिद्ध पर्यटनस्थळावर कोकेन विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने पर्यटन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचगणी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पाच लाख रुपये किमतीचं १३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं असून मुंबईतील रेकॉर्डवरचे दहा जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. या कारवाईत महागड्या स्कोडा आणि एमजी हेक्टर गाड्या, मोबाईल फोनसह एकूण ४२ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जावळी तालुक्यातील सावरी गावात एमडी ड्रग्जची फॅक्टरी उध्वस्त केल्याची घटना ताजी असतानाच पाचगणीतील ही मोठी कारवाई झाल्याने सातारा जिल्ह्यात ड्रग्ज रॅकेट सक्रिय असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. संशयित आरोपी हे पर्यटनाच्या बहाण्याने पाचगणीत आले होते आणि एका खासगी ठिकाणी पार्टीसाठी जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कोकेन संदर्भातील गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पाचगणीतील विस्टा ग्रॅन्ड सोसायटीत छापा टाकला.
इस्टेट 1A या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कोडा कार (MH 02 DN 0259) आणि एमजी हेक्टर कारमध्ये (MH 01 DK 88025) दहा जण बसले होते. पोलिसांनी केलेल्या अंगझडतीदरम्यान त्यांच्या ताब्यात पाच लाख रुपये किमतीचं १३ ग्रॅम कोकेन आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत कारवाई पुढे नेली.
छाप्यादरम्यान विस्टा ग्रॅन्ड सोसायटीतील इस्टेला १ ए बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभी असलेली पांढऱ्या रंगाची स्कोडा रॅपिड कार (एमएच ०२- डीएन ०२५९) तपासली असता त्यात पाच जण बसलेले आढळले. त्याच ठिकाणी एम. जी. हेक्टर कारमध्ये (एमएच ०१ डीके ८८०२) आणखी पाच जण आढळले. असे एकूण १० संशयित पोलिसांच्या ताब्यात आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये महंमद नावेद सलिम परमार, सोहेल हशद खान, महंमद रिजवान अन्सारी, वासिल हमीद खान, अली अजगर सादिक राजकोटवाला, महंमद साहिल अन्सारी, जिशान इरफान शेख, सैफ अली कुरेशी, महंमद उबेद सिद्दिकी आणि राहिद मुख्तार शेख यांचा समावेश असून हे सर्व आरोपी मुंबईतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून कोकेन कुठून आणण्यात आलं, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि पाचगणी तसेच महाबळेश्वर परिसरात ड्रग्ज नेटवर्क किती सक्रिय आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. पाचगणीसारख्या पर्यटनस्थळी ड्रग्ज विक्रीचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

