(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील तरवळ येथील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी निवळी ते जयगड या महामार्गावर सध्या सतत च्या पावसामुळे पडलेले मोठ मोठे जीव घेणे खड्डे बुजविण्याचे काम या सर्व कार्यकर्त्यांनी रविवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी केले. रविवार सुट्टीचा दिवस असुनही या सर्व कार्यकर्त्यांनी कुठेही फिरण्यासाठी न जाता अशा प्रकारे सार्थकी लावला.
सध्या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे या निवळी ते जयगड महामार्गावर सातत्याने जीवघेणे खड्डे पडत असतात. याचा या महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. जीव मुठीत घेऊन दुचाकीस्वार या मार्गावरून जात असतात. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता अधिक असते. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कोणाचाही जीव जाऊ नये यासाठी साठी सर्व कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन हे काम केले. या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांनी राज्याचे उद्योग मंत्री मराठी भाषा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना .उदय सामंत यांच्या प्रेरणेतून हे काम केले आहे. दगड, माती यांच्या सहाय्याने या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी तात्पुरता स्वरूपात सदर ठिकाणचे खड्डे बुजविण्याचे काम केले आहे.
सदर महामार्गावरील धोकादायक खड्डे बुजविण्याचे काम युवा सेना तालुका प्रमुख तुषार साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना विभाग प्रमुख नंदकुमार कुवार तसेच त्यांचे सर्व युवा सेनानी युवक संघटक अक्षय कुळ्ये, संवेश कुळ्ये, प्रसाद कुळ्ये, सुमेध कुळ्ये, मयुरेश कुळ्ये, सुमित गोणबरे, राहुल कुळ्ये, अंश गोरीवले तसेच मोठ्या संख्येने इतर युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
या निमित्ताने प्रशासनाला देखील आवाहन करण्यात आले आहे की, या महामार्गावरील धोकादायक खड्डे त्वरित कायमस्वरूपी भरून काढण्यात यावेत आणि कोणाचाही या खड्ड्यांमुळे नाहक बळी जाऊ नये असे आवाहन केले आहे.