(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील टीआरपी परिसरातील एका दुचाकी कंपनीच्या कर्मचाऱ्याला क्रेडिट कार्ड विमा प्रक्रियेच्या नावाखाली जाळ्यात ओढून त्याच्या खात्यातून तब्बल ८७ हजार ६४२ रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद रघुनाथ यादव (वय ३१, रा. सौम्या रेसिडेन्सी, श्रीरामनगर, नाचणे, रत्नागिरी) हे टीआरपी येथील यामाहा शोरूममध्ये नोकरीच्या निमित्ताने कार्यरत असताना १२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते सव्वा एकच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीकडून फोन आला. संबंधित व्यक्तीने स्वतःला एसबीआय क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून, क्रेडिट कार्डवरील विमा योजनेंबाबत विचारणा केली. त्यानंतर विमा सेवा निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सांगण्याच्या बहाण्याने प्रसाद यादव यांच्या व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठविण्यात आली.
ही लिंक उघडून अॅपमध्ये वैयक्तिक माहिती भरून घेतल्यानंतर संशयिताने त्यांच्या क्रेडिट कार्डवरून ८७ हजार ६४२ रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने वळती केली. फसवणुकीची बाब लक्षात येताच प्रसाद यादव यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर पोलिसांकडून सुरू आहे. सायबर माध्यमातून होणाऱ्या अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

