(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई आणि चालक पदांच्या भरती प्रक्रियेत यंदा स्थानिक तरुण-तरुणींनी लक्षणीय यश संपादन करत आपली छाप उमटवली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाने जाहीर केलेल्या तात्पुरत्या निवड यादीत तब्बल ४५ स्थानिक उमेदवारांचा समावेश असून, बाहेरील जिल्ह्यांच्या वर्चस्वाला छेद देत स्थानिकांनी गुणवत्ता आणि जिद्दीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
जिल्हा पोलिस दलातील १०० पोलिस शिपाई आणि ८ चालक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया काटेकोर नियोजनासह पारदर्शकपणे पार पडली. उमेदवारांना शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि चालक पदासाठी स्वतंत्र कौशल्य चाचणी अशा विविध कठीण टप्प्यांतून जावे लागले. या सर्व स्तरांवर उत्कृष्ट कामगिरी करत स्थानिक उमेदवारांनी यश मिळवले. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील अनेक उमेदवारांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले आहे. महिलांचाही सहभाग उल्लेखनीय ठरला असून, त्यांनीही आपल्या कर्तृत्वाची ठोस नोंद केली आहे. परिणामी, जिल्हा पोलिस दलात स्थानिक भाषा, भौगोलिक जाण आणि सामाजिक वास्तवाची समज असलेले सक्षम मनुष्यबळ वाढण्यास हातभार लागणार आहे.
दरम्यान, जाहीर करण्यात आलेली यादी तात्पुरती असून, निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

