( रत्नागिरी )
रत्नागिरी शहरातील राजवाडी क्रीडा मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अक्षय तृतीया निमित्त दरवर्षी आयोजित केली जाणारी ही मानाची स्पर्धा यंदाही क्रीडाप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील १६ संघांनी सहभाग घेत क्रीडांगण गाजवले. अंतिम सामना भगवती स्पोर्ट्स किल्ला आणि यंग बॉईज फगरवाठार यांच्यात रंगला. दोन्ही संघांनी चुरशीचा खेळ करत प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले. अखेर भगवती स्पोर्ट्स किल्ला संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेदरम्यान प्रत्येक सामन्याला प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विशेषतः अंतिम सामन्यानंतर क्रीडाप्रेमींनी जल्लोष करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
यंदा राजवाडी क्रीडा मंडळाच्या स्थापनेला ७० वर्षे पूर्ण होत असल्याने स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. समारोप सोहळ्यात बक्षीस वितरण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर मोंडकर, प्रवीण दळवी, सचिव प्रथमेश मोंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
रत्नागिरी शहरातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेने यंदाही थरार, उत्साह आणि क्रीडाभावनेचा सुंदर संगम घडवून आणत विजेत्या भगवती स्पोर्ट्स किल्ला संघाच्या यशावर शिक्कामोर्तब केले.

