पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) प्रकरणात दिवसेंदिवस नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सध्या तिची पोलिस कोठडीत कसून चौकशी सुरू असून, तिच्या मोबाईलमध्ये सापडलेली माहिती अधिकच संशयास्पद ठरत आहे.
‘जट्ट रंधावा’ आणि ‘बिल्लो तेरी आंख कतल’ – कोड की कनेक्शन?
पोलिसांच्या तपासात उघड झालं की, ज्योतीने तिच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानी हँडलर्सचे नंबर वेगवेगळ्या कोड नेम्सनी सेव्ह केले होते. त्यात एक नंबर ‘जट्ट रंधावा’ या नावाने सेव्ह केला होता. इतकंच नव्हे, तर तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिने ‘बिल्लो तेरी आंख कतल’ असं कॅप्शन लिहिलं होतं, जो फोटो जम्मू-कश्मीरमधील बाली येथे काढलेला होता.
या दोन संदिग्ध गोष्टींमुळे ज्योती आणि पाकिस्तानी हँडलर यांच्यातील संबंधांवर शिक्कामोर्तब झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पोलिसांचा दावा आहे की, ही कोड भाषा म्हणजे हेरगिरीचं नेटवर्क व्यवस्थित रचलेलं होतं.
एन्क्रिप्टेड अॅप्सवरून माहितीचा गुप्त प्रसार
पोलिस तपासात असंही समोर आलंय की, ज्योती WhatsApp, Telegram आणि Snapchat सारख्या एन्क्रिप्टेड अॅप्सचा वापर करून संवेदनशील माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवत होती. त्यामुळे तिच्यावर राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मैत्रीण प्रियंका सेनापतीच्या भूमिकेचीही चौकशी
ज्योतीच्या अटकेनंतर पोलिस चौकशीत तिची घनिष्ट मैत्रीण, युट्यूबर प्रियंका सेनापती हिचं नाव समोर आलं आहे. प्रियंका सध्या ओडिशामधील पुरी येथे राहते. पोलिसांनी तिच्या घरी छापेमारी करत तिचा डिजिटल डिव्हाइसेसवरून शोध घेतला. सध्या तिची चौकशी सुरू आहे.
हेरगिरीच्या संशयावरून खळबळ
6 मे रोजी जम्मू-कश्मीरमधून परतल्यानंतर काहीच दिवसांत ज्योतीवर ही कारवाई झाली. ती सध्या हरियाणातील हिसार येथे अटकेत आहे आणि तिच्यावर गंभीर स्वरूपाचे हेरगिरीचे गुन्हे दाखल आहेत.