(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकणातल्या भूमीत गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर भावविश्वाला हलवून टाकणारा आनंदाचा उत्सव. गेल्या पाच दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात गौरी-गणपतीचा उत्साह ओसंडून वाहला. घराघरांतल्या आरासलेल्या बाप्पांच्या प्रतिमा, पारंपरिक गजरात सजलेल्या मिरवणुका आणि भक्तांच्या अखंड जयघोषाने संपूर्ण जिल्हा दुमदुमून गेला होता.
मंगळवारी विसर्जनाचा क्षण आला, आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या सादेने प्रत्येकाचे डोळे भरून आले. स्वागत जितक्या जल्लोषात झाले, तितक्याच हळव्या मनाने बाप्पांना निरोप देण्यात आला. २७ ऑगस्ट रोजी ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. त्यानंतर रविवारी गौराईचे आगमन आणि सोमवारी गौरीपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात तब्बल १ लाख ६९ हजार ४२६ घरांमध्ये आणि १२६ सार्वजनिक मंडळांत बाप्पांची स्थापना झाली. गौरी-गणपतीच्या या पर्वात प्रत्येक घर आनंदाने उजळून निघाले होते. विसर्जनाच्या दिवशी जिल्ह्यात १ लाख १ हजार ३२९ घरगुती गणपती आणि १६ सार्वजनिक गणपतींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. हा केवळ धार्मिक विधी नव्हता, तर भक्तीभाव, आठवणी आणि भावनांचा एकत्रित संगम होता.
रत्नागिरी शहरात मांडवी चौपाटीवरील विसर्जन सोहळा पाहण्यासारखा ठरला. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांमुळे वातावरण भारून गेले होते. मोठ्या प्रमाणावर जमलेल्या गर्दीसाठी पोलिस, सुरक्षा रक्षक तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व्यवस्थापनासाठी तत्पर होते. मांडवी, भाट्ये किनारा, पांढरा समुद्र यांसह प्रमुख विसर्जन घाटांवर भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. वाहतुकीचे सुयोग्य नियोजन केल्यामुळे विसर्जन सोहळा सुरळीत पार पडला.
गणेशोत्सवाने दिल्या आनंदाच्या आठवणी….
शहरासोबतच मिऱ्या बंदर, काळबादेवी, साखरतर, आरेवारे, शिरगाव, नाचणे, खेडशी आदी ठिकाणीही नदी, तलाव आणि समुद्रात पारंपरिक विधींनी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाने दिलेल्या आनंदाच्या आठवणी, घराघरांत उमटलेला भक्तिभाव आणि एकात्मतेचा सण यामुळे हा निरोप प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी साठून राहिल्याचे चित्र आहे.

