(कोल्हापूर)
कोल्हापुरातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आराम बसवर दरोडा टाकणाऱ्या सात जणांच्या टोळीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 12 तासांत अटक केली आहे. या कारवाईत चोरलेला सुमारे 1 कोटी 22 लाख रुपयांचा सोने, चांदी व अन्य मौल्यवान मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही घटना 22 डिसेंबर 2025 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. कोल्हापुरातून मुंबईकडे जाणाऱ्या आराम बसचा पाठलाग करत आरोपींनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर बस अडवली. बस क्लिनरच्या गळ्याला चाकूचा धाक दाखवत चालकाला गाडी थांबवण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर चालकाला मारहाण करून प्रवाश्यांच्या सामानामधील सोने, चांदी आणि मोबाईल, स्पेअर पार्ट्स असा सुमारे 1.22 कोटींचा मुद्देमाल जबरदस्तीने पळवून नेण्यात आला.
या घटनेप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
नियोजनबद्ध दरोड्याची उकल
तपासादरम्यान आरोपींनी आधीच बसचा पाठलाग करून योग्य संधी साधल्याचे निष्पन्न झाले. सुनियोजित पद्धतीने वाहन अडवून चालकावर हल्ला करत दरोडा टाकण्यात आला होता. हा गुन्हा पूर्णपणे पूर्वनियोजित असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोका कंपनीची खासगी आराम बस रविवारी रात्री ११ च्या सुमारास कोल्हापूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली. कोल्हापूर शहराबाहेरील तावडे हॉटेलजवळ तीन अनोळखी व्यक्ती प्रवासी म्हणून बसमध्ये चढले. ही बस पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी गावच्या हद्दीतील ‘भुताचा माळ’ परिसरात आली असता, बसमध्ये आधीच बसलेल्या त्या तिघांनी अचानक चाकूचा धाक दाखवून चालकाला बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यास भाग पाडले.
बस थांबताच पाठीमागून एका वाहनातून आलेल्या पाच ते सहा साथीदारांनी बसला वेढा घातला. हे सर्व दरोडेखोर बसमध्ये शिरले आणि त्यांनी अरेरावी करत प्रवाशांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी बसमधील सुतळी बारदानातील ३४ किलो आणि प्लास्टिक पोत्यातील २६ किलो अशी एकूण ६० किलो चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट, १० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि मोबाईल हँडसेट असा एकूण १ कोटी २२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी जाताना बसचालक आणि प्रवाशांना सज्जड दम भरला. ‘या परिसरात अजिबात थांबायचं नाही, पुढे निघून जा, नाहीतर जीवानिशी मारून टाकू’ अशी धमकी देऊन ते पसार झाले. प्रचंड घाबरलेल्या बसचालकाने बस तशीच पुढे नेली आणि सांगली जिल्ह्यातील कणेगाव येथे बस थांबवून ‘११२’ क्रमांकावर पोलिसांना संपर्क साधला.
सीसीटीव्ही व गोपनीय माहितीचा मोठा उपयोग
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तपासाची दिशा ठरवली. त्यानुसार मुख्य आरोपी अक्षय कदम (रा. विक्रमनगर, कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आणखी सहा साथीदारांना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास वडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली. अवघ्या 12 तासांत दरोडा उघडकीस आल्याने पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

