(रायगड)
जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे पेटारवाडी (जि. रायगड) येथील पोल्ट्री फार्मच्या मागील बाजूस घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये एलपीजी गॅस भरल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही रिफिलिंग पूर्णतः अनधिकृत आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने करण्यात येत होती.
या प्रकरणी चेतन पांडुरंग खडे (३७) व हर्षद संतोष कालेकर (२१) – दोघेही गुडवण (ता. कर्जत) येथील रहिवासी – यांनी अंजली गॅस एजन्सी, मुरबाड यांच्यामार्फत काळ्या बाजारातून घरगुती गॅस सिलेंडर खरेदी करून, कॉम्प्रेसर मशीनच्या साहाय्याने व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस रिफिलिंग सुरू केली होती. हे सिलेंडर ते उच्च दराने विकून प्रति सिलेंडर सुमारे ५०० रुपये नफा मिळवत होते.
कर्जत तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक रविंद्र पांडुरंग दळवी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर, त्यांनी नेरळ पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत सुमारे ₹१०,२०,६०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात १०३ घरगुती एलपीजी सिलेंडर, १०० हून अधिक रिकामे व्यावसायिक सिलेंडर, ६ कॉम्प्रेसर, ७ इलेक्ट्रिक वजनकाटे, स्टिकर बंडल्स, पाईप व रेग्युलेटर तसेच एक बोलेरो पिकअप वाहन यांचा समावेश आहे.
या प्रकरणी चेतन खडे, हर्षद कालेकर आणि अंजली गॅस एजन्सी (मुरबाड) यांच्याविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ९१/२०२५ अन्वये जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३, ७, तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम २८७ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चेतन खडे व हर्षद कालेकर यांना ताब्यात घेतले असून, प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गच्चे हे करत आहेत.