(ठाणे)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) निवडणूक 2026 साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला असतानाच भारतीय जनता पक्षाने (BJP) पहिला विजय नोंदवला आहे.
प्रभाग क्रमांक 18A मधील ओबीसी महिला राखीव जागेसाठी भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. या प्रभागातून कोणत्याही अन्य पक्षाने किंवा अपक्ष उमेदवाराने अर्ज न भरल्यामुळे रेखा चौधरी यांचा बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत. रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय आहे अशी भाजपने प्रतिक्रिया दिली आहे.
आज, 31 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडणार असून, तांत्रिक अडचणी नसल्यास निवडणूक आयोगाकडून त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे केडीएमसी निवडणुकीत भाजपचे खाते उघडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, 122 जागांसाठी होणारी केडीएमसी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. महायुतीसमोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 73 जागांवर तर राज ठाकरे यांच्या मनसेचे 49 जागांवर मजबूत आव्हान उभे आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेना-भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट ‘एबी फॉर्म’ देण्याची रणनीती अवलंबली होती. मात्र काही प्रभागांमध्ये बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने महायुतीसमोर नाराजांची समजूत काढण्याचे आव्हान कायम आहे.
15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारीला निकाल जाहीर होतील. भाजपच्या या बिनविरोध विजयामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

