(रत्नागिरी)
जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणारा उपक्रम राबवत, आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘लेव्हल-३ तायक्वॉंदो रोलिंग मॅट’ आणि जनरेशन-३ सेन्सर किट रत्नागिरीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या अत्याधुनिक सुविधांमुळे स्थानिक खेळाडूंना आता जागतिक स्तरावर सराव करण्याची संधी मिळणार आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आणि खेळाडूंच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेले उद्योग मंत्री श्री. उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा उपक्रम साकार झाला आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता असूनही आवश्यक सुविधा व साधनसामग्रीच्या अभावामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही उणीव लक्षात घेऊन शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आणि त्यातूनच या आधुनिक सुविधांची उपलब्धता झाली.
या ‘लेव्हल-३’ मॅट आणि सेन्सर किटमुळे खेळाडूंना तंत्रशुद्ध आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा सराव करता येणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अधिक प्रभावी कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.
या सुविधांचे उद्घाटन १८ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, मारुती मंदिर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये संपन्न झाले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, बीपीन बंदरकर, सौरभ मालुष्टे, नगरसेवक तसेच तायक्वॉंदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना, शाहरुख शेख आणि मिलिंद भागवत उपस्थित होते.
कार्यक्रमास गणराज आणि एसआरके तायक्वॉंदो क्लबचे पदाधिकारी, खेळाडू आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले. अध्यक्ष व्यंकटेश कर्रा, सचिव लक्ष्मण कर्रा आणि कोषाध्यक्ष शशांक घडशी यांनी या उपक्रमामुळे जिल्ह्यातील क्रीडा चळवळीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

