(सातारा)
सातारा जिल्ह्यातील बारमाही दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यातील मलवडी गावातून एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. त्रिबक दाजी बोराटे या शेतकऱ्यांच्या गोट्यातील मुऱ्हा संकरीत म्हशीच्या पोटी जन्मलेली ‘राधा’ ही म्हैस जगभर चर्चेत आली आहे. कारण तिची उंची केवळ दोन फूट आठ इंच (८९.८ सेमी) असून ती जगातील सर्वात बुटकी पाळीव म्हैस म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली आहे.
१९ जून २०२२ रोजी जन्मलेल्या राधाची उंची दोन वर्षांनंतरही वाढत नसल्याचे बोराटे यांचे कृषी पदवीधर पुत्र अनिकेत बोराटे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी राधाला विविध कृषी प्रदर्शनांत सहभागी करण्याचा निर्णय घेतला. सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात पहिल्यांदा राधाची उपस्थिती ठरली आणि तिथूनच तिचा बोलबाला सुरू झाला.
यानंतर राधाने श्री सेवागिरी कृषी प्रदर्शन, पुसेगाव, इंदापूर कृषी प्रदर्शन, संगमनेर कृषी महोत्सव, कृषी उत्सव, निपाणी (कर्नाटक) या ठिकाणी सहभाग घेत पारितोषिके पटकावली. तिच्या या लोकप्रियतेनंतर अनिकेत बोराटे यांनी स्थानिक पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कागदपत्रांसह गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज केला. अखेर २८ ऑक्टोबर २०२५ रोजी राधाची ‘जगातील सर्वात बुटकी पाळीव म्हैस’ म्हणून अधिकृत नोंद झाली. त्याचबरोबर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्येही राधाचे नाव झळकले आहे.
राधाची उंची वाढली नसली तरी तिच्या कीर्तीने नवे उच्चांक गाठले आहेत. उंचीवर परिणाम करणारी जनुके तिच्यामध्ये पूर्ण विकसित न झाल्याने ती वाढली नाही, असे डॉ. थोरात यांनी सांगितले. राधाच्या आईची उंची मात्र सामान्य होती. कमी उंचीमुळे राधा गाभण होणे शक्य नाही, परंतु तिचे आरोग्य उत्तम असून ती संपूर्ण निरोगी आहे.
सामान्य मुऱ्हा म्हशींची उंची पाच ते सहा फूट आणि वजन सुमारे ५०० किलोपर्यंत असते. मात्र राधाची उंची फक्त दोन फूट आठ इंच असून वजन २८५ किलो आहे. तिचा रोजचा आहार मका, कडवळ, मेथी गवत, हात्ती गवत, तसेच खुराकामध्ये शेंगदाणा पेंड, मका भुस्सा आणि गव्हाचे पीठ असतो.
“राधाची उंची वाढली नाही, पण तिच्या कीर्तीने माण तालुक्याचं नाव जगभर नेलं,” असं बोराटे कुटुंब अभिमानाने सांगत आहेत.

