( चिपळूण )
चिपळूण तालुक्यातील पालवण (ढोरपाल) येथील विहिरीत बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. १५ जुलैपासून बेपत्ता असलेल्या प्रियांका गजानन चव्हाण (वय ५२, रा. पालवण, साठलेवाडी) यांचा मृतदेह तीन दिवसांनंतर विहिरीत सापडल्याने साठलेवाडीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका चव्हाण या १५ जुलै २०२६ रोजी राहत्या घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर सावर्डे पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद (रजि. क्र. १०/२०२६) करण्यात आली होती.
दरम्यान, १८ जुलै रोजी पालवण (ढोरपाल) येथील एका विहिरीत महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिकांच्या निदर्शनास आला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. ओळख पटविल्यानंतर हा मृतदेह प्रियांका चव्हाण यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला की या घटनेमागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस विविध अंगांनी करत आहेत.
याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (अमृ. क्र. १३/२०२६) करण्यात आली असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

