(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टी भागातील मीठगवाणे व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून त्यांच्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या मीठगवाणे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य वार्षिक सहलीचे आयोजन करण्यात आले. सलग तीन वर्षांपासून संघ सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, यावर्षीची सहल अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या सहलीत ४५ ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सकाळी मीठगवाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रवासास प्रारंभ झाला. राजापूर एस.टी. आगाराची विशेष बस बुक करून ही सहल आयोजित करण्यात आली होती. सहलीची सुरुवात खारेपाटण परिसरातील ७२ खेड्यांचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री काळभैरव मंदिर आणि श्री देव कपिलेश्वर मंदिर यांच्या दर्शनाने झाली. त्यानंतर कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे सद्गुरु टेंबे स्वामी यांच्या जन्मभूमी असलेल्या श्री दत्त मंदिर येथे भेट देण्यात आली. येथे दुपारची आरती व महाप्रसादाचा लाभ घेतल्याने वातावरण भक्तिमय झाले. पुढे कुडाळ पिंगुळी येथील राऊळ महाराज मठ, देवगड तालुक्यातील हडपिड येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठ तसेच वरेरी, देवगड येथील बाळूमामा मठ या धार्मिक स्थळांना भेट देऊन सहलीचा धार्मिक आणि आध्यात्मिक आनंद द्विगुणित झाला.
हडपिड, देवगड येथे श्री व सौ. राणे या उभयतांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला. त्यांच्या या आत्मीय आदरातिथ्यामुळे सहलीत विशेष आपुलकीची भावना निर्माण झाली. संपूर्ण प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी नाच-गाणी, एकमेकांशी हितगुज, जुन्या आठवणींना उजाळा देत आनंद लुटला. वयोमानानुसार येणारा एकाकीपणा दूर करून मानसिक ताजेपणा, सामाजिक संवाद आणि सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी अशा सहली अत्यंत आवश्यक ठरतात. अशा उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण होते, हे या सहलीतून प्रकर्षाने जाणवले. रात्री आठ वाजता सहल पुन्हा मीठगवाणे येथे परतली.
या सहलीचे आयोजन पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आले होते. संघाचे मुख्य प्रवर्तक श्रीधर पावसकर, अध्यक्ष विलास चेऊलकर, सचिव रमेश राणे, उपाध्यक्ष एकनाथ आडीवरेकर, खजिनदार सत्यवान कनेरी, विजय मोर्ये, मधुकर पावसकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच नाटे येथील व्यावसायिक संदेश पाथरे आणि पत्रकार राजन लाड हेही सहलीत सहभागी झाले होते. सर्वांच्या सहकार्यामुळे ही सहल यशस्वी, संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरली.

