( संगमेश्वर )
संगमेश्वर बाजारपेठेतील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे संपूर्ण परिसर अंधारात जाण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदार कंपनीने गटार खोदकाम करताना विद्युत पुरवठा करणारी महत्त्वाची केबल उघड्यावर आणली असून, ती तुटण्याच्या अवस्थेत असल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भागात यापूर्वीच एक केबल निकामी झाल्याने संपूर्ण बाजारपेठ फक्त एकाच केबलच्या आधारावर चालू आहे. मात्र सद्यस्थितीत ही कार्यरत असलेली केबलदेखील उघड्यावर आल्याने तिचे संरक्षण धोक्यात आले आहे. केबल कोणत्याही क्षणी खराब होऊन संपूर्ण बाजारपेठेचा वीजपुरवठा खंडित होण्याचा संभव आहे. चौपदरीकरणाच्या कामाच्या अंतर्गत भूमिगत केबल टाकण्यात आली असली तरी ती निकृष्ट दर्जाची असून तिच्या गुणवत्तेबाबत कोणतीही खात्री केली गेली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. ही केबल भविष्यात अपयशी ठरल्यास बाजारपेठ अंधारात जाण्याची शक्यता आहे, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, अशा निष्काळजीपणामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत आहे. कामाच्या दर्जाबाबत तक्रारी असूनही ठेकेदार कंपनीकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांत संतापाची भावना आहे. प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घ्यावी, निकृष्ट दर्जाच्या केबलची तात्काळ तपासणी करून ती दर्जेदार केबलने बदलावी, तसेच बाजारपेठेतील विद्युत सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी व्यापारी आणि नागरिकांमधून केली जात आहे.