(देवळे / प्रकाश चाळके)
रत्नागिरी जिल्ह्यातील हतखंबा जवळील निवळी गावच्या नवलाई मित्र नमन मंडळात राधेची भूमिका साकारणारी बालकलाकार ओवी सुशांत गावडे हिने चाफवली येथील चाफनाथ मंदिरात चैत्र शिवरात्री उत्सवानिमित्त नमनाचा 203 वा प्रयोग यशस्वीरीत्या सादर केला. अवघ्या आठ वर्षांची असलेली ओवी सध्या तिसरी इयत्तेत शिक्षण घेत असून, बालवाडीपासूनच तिने नमनात काम करण्यास सुरुवात केली आहे. तिच्या अभिनयातील सहजता आणि आत्मविश्वासामुळे ती अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी बनली आहे.
चाफनाथ मंदिरात सादर झालेल्या या प्रयोगात ओवीने साकारलेली राधेची भूमिका विशेष गाजली. तिच्या भावपूर्ण अभिनयाने आणि निरागस सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली. यापूर्वीही ओवीने पोलीस खात्याशी संबंधित “साथ खाकी वर्दीची” या विशेष मालिकेतील एका भागात भूमिका साकारली आहे.
203 व्या प्रयोगानिमित्त चाफवलीतील ग्रामस्थांकडून ओवीचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, भविष्यात नाटक, मालिका आणि चित्रपट क्षेत्रातही तिला संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

