(रत्नागिरी)
कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी पात्र लाभार्थ्यांची अचूक पडताळणी करून पुढील कार्यवाही तत्काळ सुरू करावी, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
कुवारबाव ग्रामपंचायत सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेवक बंड्या साळवी, पंचायत समिती उपसभापती गजानन धनावडे, जि.प. सदस्य प्रकाश रसाळ तसेच ग्रामपंचायत प्रशासक श्रीमती तळेकर उपस्थित होते.
कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित असून, योजनेबाबत रहिवाशांना सविस्तर माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे गरजू नागरिकांना सुरक्षित घरे उपलब्ध होऊन त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होणार आहे. त्यासाठी पात्रतेची काटेकोर पडताळणी करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शासन निर्णयाबाबत काही अफवा पसरत असल्याचे निदर्शनास आले असून, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
या पुनर्वसन प्रकल्पांतर्गत मुलांसाठी शिक्षण व खेळासाठी स्वतंत्र जागा, अंगणवाडी आणि बालवाडीची सुविधा एकाच परिसरात उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा राज्यातील आदर्श प्रकल्प ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
बैठकीच्या प्रारंभी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.

