(रत्नागिरी /प्रतिनिधी)
ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून झालेल्या लाखो रुपयांच्या फसवणुकीचा रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी वेधक तपास करत पर्दाफाश केला असून, या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि अचूक नियोजन यांच्या बळावर पोलिसांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
जयगड सागरी पोलीस ठाण्यात २१ मार्च २०२६ रोजी तक्रार दाखल झाली होती. तक्रारदाराच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ८२ हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून परस्पर काढून घेतल्याचे उघड झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तांत्रिक तपासाला गती दिली. डिजिटल ट्रेलचा माग काढत आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचे मुंबईतील ठिकाण निश्चित करण्यात आले. यानंतर विशेष पथकाने मुंबईत सापळा रचून दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी तक्रारदाराच्या खात्यातून रक्कम काढल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव तसेच जयगड सागरी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने या तपासात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान, या प्रकरणात अधिक तपास सुरू असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारे इतर नागरिकांची फसवणूक केली आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

