(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. १६ एप्रिल रोजी चिपळूण, लांजा, राजापूर आणि रत्नागिरी शहर परिसरात एकाच दिवशी विविध ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी गुन्हे नोंदवले. या कारवाईत रिक्षा, दुचाकी तसेच बोलेरो पिकअपसह पाच वाहनांचा समावेश आहे.
चिपळूण येथील बहादूरशेख नाका परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर कोकणदीप सुपर मार्केटसमोर मॅक्झिमा रिक्षा (क्र. MH 08 BC 1936) वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत उभी करून चालक दत्ताराम नारायण शिंदे हा निघून गेल्याचे आढळून आले. या प्रकाराबाबत चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लांजा येथेही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गावरील न्यू इंग्लिश स्कूलसमोर स्प्लेंडर प्लस दुचाकी (क्र. MH 08 BD 7067) धोकादायक पद्धतीने उभी केल्याप्रकरणी संतोष नारायण झोरे याच्यावर लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजापूर शहरात जवाहर चौक ते गणेशघाट मार्गावरील शिवपार्वती हॉटेलसमोर रिक्षा (क्र. MH 08 BC 3772) आडवी उभी करून वाहतुकीची शिस्त भंग केल्याबद्दल राहुल यशवंत सोगम याच्यावर राजापूर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.
रत्नागिरी शहरातील चर्मालय चौक येथे कोकणनगरकडे जाणाऱ्या मार्गावर महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH 08 AP 3767) उभी करून वाहतुकीची कोंडी निर्माण केल्याप्रकरणी संदीप प्रकाश लाड याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच रत्नागिरी-हातखंबा मार्गावरील खेडशी गयाळवाडी येथील सर्विस रोडवर मारुती सुझुकी झेन (क्र. MH 08 AX 0191) पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत उभी केल्याप्रकरणी संदीप बबन फोडे याच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. या सर्व प्रकरणांमध्ये भारतीय दंड संहिता कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

