(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील नावडी येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री निनावी देवी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर, रविवार (दि. १९ एप्रिल २०२६) रोजी मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे.
कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे जागृत देवस्थान असून वर्षभर भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी असते. आदिशक्तीचे रूप मानल्या जाणाऱ्या श्री निनावी देवीच्या या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण नावडी परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.
या निमित्ताने सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक विधींना प्रारंभ होईल. शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचार पूजा, अभिषेक, आरती आणि मंत्रपुष्पांजली अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी ११:३० पासून भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात येणार असून महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.
दुपारच्या सत्रात सौभाग्यवतींसाठी हळदी-कुंकू समारंभ होणार असून हा स्त्रीशक्तीच्या पूजनाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. सायंकाळी श्री निनावी देवी महिला भजन मंडळाच्या सुमधुर भजनांनी वातावरण भक्तिरसाने भारून जाईल. त्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील विविध भजन कलाकारांचा भजन मेळा रंगणार आहे.
रात्री ९:३० वाजता श्री देव रवळनाथ नमन मंडळ, निवळी यांच्याकडून पारंपरिक लोककलेचे सादरीकरण होऊन सोहळ्याची सांगता होणार आहे.
या भक्तीमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, देवीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन निनावी देवी प्रासादिक मंडळाचे अध्यक्ष व मानकरी दत्ताराम (बावा) सुर्वे यांनी केले आहे.

