(जाकादेवी / संतोष पवार)
विद्यापीठांमधून शिक्षणाच्या पदव्या मिळतात तर महापुरुषांच्या विचारांमधून संस्काराच्या पदव्या मिळत असतात. आजच्या काळात संस्कार फार महत्त्वाचे आहे.अशोक खरात सारखे प्रकरण राज्यासह देशाला घातक आहे. काळोखाच्या साम्राज्यात गुंडांना महत्त्व दिले जात असल्याची कृत्ये समाजाच्या आणि देशाच्या विकासाला मारक आहे. त्यामुळे आज वर्तमानपत्रात अनैतिक संदर्भात ज्या ज्या बातम्या प्रकाशित होतात, जे जे गुन्हे घडत आहे ते सर्व संस्काराच्या अभावी घडत आहे. विश्वरत्न डॉ.आंबेडकर हे सर्वच क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरल्या मागे एकच कारण होते आणि ते म्हणजे ते विद्वान होतेच शिवाय शिलवानतेमुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार बनू शकले.आपल्या राष्ट्राला प्रगतीच्या पथावर नेऊ शकले.अशा प्रकारचे प्रेरणादायी विचार मुंबईचे युवा व्याख्याते स्वप्निल कदम यांनी रत्नागिरी येथे बौद्धजन पंचायत समिती आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात बोलताना केले.
यावेळी बौद्धजन पंचायत समितीचे धडाडीचे व उपक्रमशील अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, रत्नागिरी नगरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, जि.प. सदस्य बाबु म्हाप, सचिव सुहास कांबळे, सहसचिव शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, प्रमुख व्याख्याते स्वप्निल कदम, महिला मंडळाच्या अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर, उपाध्यक्षा ऋतिका जाधव, चिटणीस दिया कांबळे, सहचिटणीस सानवी कांबळे, शिक्षण समिती अध्यक्ष जयवंत कदम यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्याख्याते स्वप्निल कदम पुढे बोलताना म्हणाले की, डॉ.बाबासाहेबांसारखे प्रज्ञासूर्य आपल्या जीवनामध्ये आल्यामुळे आपल्या समाजात आणि देशात नवक्रांती निर्माण झाली,नवचैतन्य निर्माण झाले.नवी उर्जा मिळालीआपल्या जीवनात सोन्याचे दिवस आले. आजच्या पालकांनी आपली मुले आयपीएस अधिकारी, वकील, डॉक्टर, इंजिनियर अशा उच्चतम क्षेत्रातील स्वप्न जरूर पहावीत, त्यासाठी प्रयत्नही करावेत, परंतु प्रथम त्यांना चांगला माणूस घडविण्याचे काम पालकांनी केले पाहिजे. तरच समाजात प्रगती साधली जाईल. सुसंस्कृत माणूसच समाजात मानाचे स्थान प्राप्त करू शकतो. डॉ.बाबासाहेबांचा संघर्ष आणि रमाईंचा त्याग कधी विसरता कामा नये,यासाठी पालकांनी आणि आजच्या तरुणांनी सजग राहण्याचे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते स्वप्निल कदम त्यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रकाश रा पवार यांनी केले. कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचलन व आभार सेक्रेटरी सुहास कांबळे यांनी मानले.
यावेळी लक्षवेधी चित्ररथ व लेझीम पथकासह भव्य धम्म रॅली मिरवणुकीचे मोठया उत्साहात आयोजन करण्यात आले होते. जयंतीनिमित्त रत्नागिरी आंबेडकरवाडी,फणसोप बौ.पं.रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती,महिला मंडळ, रत्नागिरी तालुक्यातील चार चित्ररथ लक्षवेधी ठरले या सर्व कार्यक्रमाला सुमारे दोन हजारापेक्षा जास्त भीम अनुयायी उपस्थित होते.
उद्योगमंत्री उदय सामंत यांचे गौरवोद्गार
रत्नागिरी तालुका आणि जिल्हाचे ठिकाण असलेल्या थिबा राजाकालीन बुद्ध विहार येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या बुद्ध विहाराच्या तांत्रिक अडचणी येत्या महिन्याभरात दूर करून बुद्ध विहाराचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे.या बुद्ध विहारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्धांच्याच विचारांचा प्रसार प्रचार केला जाईल.
या महामानवांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी आपलं जीवन खर्च केले आहे.महामानवांचे तेजस्वी प्रेरणादायी कार्य आपण सर्वांनी एकजुटीने पुढे नेण्यासाठी कटीबद्ध होऊया,असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी केले. रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या उचित कार्याबद्दल नाम.उदय सामंत व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते स्वप्निल कदम यांनी गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाची सुरवात महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सामुहिक पूजापाठाने करण्यात आली. हा कार्यक्रमात दोन हजार पेक्षा जास्त बौद्ध अनुयायींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाल्याने आयोजकांनी उपस्थितांना मनःपूर्वक धन्यवाद दिले.

