(चिपळूण /प्रतिनिधी)
पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले असून, चार्जशीट दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून पूरक तपासाची चक्रे वेगाने फिरताना दिसत आहेत. निष्पक्ष आणि सर्वसमावेशक तपासाच्या दृष्टीने पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्यांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी प्रकाश बेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित मोबाईल क्रमांकाचा सीडीआर मिळवण्यासाठी दूरसंचार कंपनीकडे अधिकृत मागणी करण्यात आली आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाची दिशा अधिक स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणात यापूर्वीच पतसंस्थेच्या १० कर्मचाऱ्यांविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, ओळख परेड आणि साक्षीदारांचे जबाब या ठोस पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आपली बाजू मजबूत केली आहे. विशेष म्हणजे, प्रशांत यादव यांच्या सीडीआर तपासातून ते घटनास्थळी अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले असून, स्वप्ना यादव यांच्या मोबाईल तपासातून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात सुरुवातीपासूनच पत्रकारांनी सखोल आणि निष्पक्ष तपासाची मागणी लावून धरली होती. त्यानुसार पोलिसांकडून तांत्रिक पुराव्यांची काटेकोर पडताळणी सुरू असल्याने तपास प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. चार्जशीटनंतर न्यायालयीन प्रक्रियेला प्रारंभ होणार असला, तरी पूरक तपासातून समोर येणारी माहितीही खटल्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. परिणामी, सीडीआर अहवालातून उलगडणारे सत्यच या प्रकरणाचा पुढील मार्ग निश्चित करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

