(रत्नागिरी / प्रतिनिधी)
एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच जिल्ह्यात हवामानातील अनिश्चिततेने नागरिकांना चांगलेच हैराण केले आहे. एकीकडे वाढता उन्हाचा कडाका, तर दुसरीकडे अधूनमधून पडणारा पाऊस, काही भागांत दाट मळभ अशा संमिश्र वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असून संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना याचा अधिक फटका बसत आहे.
गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने वाढ होत असून पारा ३३ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. त्यातच हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढल्याने उकाडा अधिकच जाणवू लागला आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडताना उन्हाचे चटके असह्य होत असून नागरिकांना टोपी, छत्री किंवा स्कार्फचा आधार घ्यावा लागत आहे. दुचाकीस्वारांनाही या वाढत्या तापमानाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, काही भागांत किरकोळ पावसाच्या सरी तर काही ठिकाणी गारांचा पाऊसही नोंदविला जात आहे. सोमवारी सकाळी काही काळ मळभ दाटल्याने पावसाची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा उन्हाची तीव्रता वाढल्याने हवामानाचा लहरीपणा प्रकर्षाने जाणवत आहे. या सतत बदलणाऱ्या वातावरणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून ताप, सर्दी, खोकला यांसारख्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे उष्माघात, अशक्तपणा, चक्कर येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
भरपूर पाणी, ताक, लिंबूपाणी यांसारखे द्रवपदार्थ नियमितपणे घ्यावेत, दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, तसेच बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी, असेही सुचविण्यात आले आहे. उन्हापासून बचावासाठी सैल व सुती कपडे परिधान करावेत आणि चक्कर आल्यास तात्काळ सावलीत विश्रांती घ्यावी, असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

