(मुंबई)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना मागील काही दिवसांत वेग आला होता. विशेषतः, आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याच्या बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, या सर्व चर्चांवर आता स्वतः आदित्य ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडत पूर्णविराम दिला आहे.
२००३ साली महाबळेश्वर येथील अधिवेशनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची ‘कार्याध्यक्ष’ म्हणून नियुक्ती केली होती. त्याच धर्तीवर आता आदित्य ठाकरे यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू होती. आगामी जून महिन्यात होणाऱ्या कार्यकारिणी बैठकीत याबाबत ठराव येण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच, १९ जून रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी याची अधिकृत घोषणा होईल, अशीही माहिती समोर येत होती.
दरम्यान, या चर्चांना आणखी बळ मिळाले ते खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे. त्यांनी माध्यमांशी बोलताना, “अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, मात्र तरुण नेतृत्वाला संधी देणे गरजेचे आहे,” असे मत व्यक्त केले होते.
मात्र, या सर्व घडामोडींवर आता आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे. या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही. कृपया ह्याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी! ”
त्यामुळे शिवसेना ठाकरे गटात सध्या तरी याबाबतची कोणतीही चर्चा नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. तसेच, या स्पष्टिकरणामुळे सध्या तरी शिवसेना ठाकरे गटात आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, पक्षात सध्या अशा प्रकारची कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नसल्याचेही अधोरेखित झाले आहे.

