(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वन विभागाच्या पुढाकारातून कराड तालुक्यातील विरवडे येथे कोल्हापूर सर्कलचे अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्र साकारत असून, या केंद्रामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि तळकोकणातील वन्यजीव संरक्षणाला मोठी बळकटी मिळणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या पाच जिल्ह्यांतील जखमी व आजारी वन्यजीवांना आता तातडीची, दर्जेदार आणि शास्त्रीय वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
राधानगरी, कोयना, चांदोली अभयारण्य तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे या परिसरात बिबटे, हरणे, गवे, रानडुकरे, अस्वल, ससे, तरस यांचा मुक्त संचार आहे. अलीकडे मानवी वस्तीपर्यंत वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात विदर्भातून आणलेल्या दोन वाघिणी सोडण्यात आल्याने वाघांचा वावरही लक्षणीयरीत्या वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विरवडे येथील उपचार केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या केंद्रात २४ तास तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टर, प्रशिक्षित सहाय्यक कर्मचारी आणि वन्यजीव रक्षक तैनात असतील. कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासाची सुविधाही उभारण्यात येत आहे. जखमी वन्यप्राण्यांसाठी प्रशस्त व सुसज्ज दवाखाना, वाघ व बिबट्यासारख्या मांसाहारी प्राण्यांसाठी अत्यंत सुरक्षित पिंजरे, तसेच हरणे, गवे व रानडुकरे यांच्यासाठी स्वतंत्र पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. दुर्दैवाने एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास याच ठिकाणी पोस्टमार्टम व अंत्यसंस्काराची सुविधाही उपलब्ध असेल.
उपचारानंतर प्राण्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी स्वतंत्र पिंजरे उभारण्यात येणार असून, पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत सोडण्यात येईल. वाहन अपघात, रेल्वे धडक, जखमा किंवा पोषणाअभावी अशक्त झालेल्या अवस्थेत अनेकदा वन्यप्राणी आढळतात. आतापर्यंत कोल्हापूर सर्कलमध्ये स्वतंत्र उपचार केंद्र नसल्याने अशा प्राण्यांना पुण्याला हलवावे लागत होते. या विलंबामुळे अनेकदा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत होता.
पुणे–बंगळूर महामार्ग, मुंबई–गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हे उपचार केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील वन्यजीव संरक्षणाला नवी दिशा मिळेल, तसेच मानव–वन्यजीव संघर्ष कमी होण्यासही मोठी मदत होईल, असा विश्वास वन विभागाने व्यक्त केला आहे.

