(रत्नागिरी)
कौटुंबिक हिंसाचार आणि आपल्याच माणसांकडून नाकारले जाण्याच्या वेदनेतून बाहेर पडत, श्रीमती सुरभी संदीप वाडेकर यांनी आयुष्याला नवी दिशा दिली आहे. आज त्या ‘भाकर सेवा संस्था’च्या वृद्धाश्रमात आजी-आजोबांची माया जपणाऱ्या एक समर्पित ‘काळजीवाहक’ म्हणून कार्यरत आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील रहिवासी असलेल्या सुरभी वाडेकर यांना आयुष्यात कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. कौटुंबिक हिंसाचारामुळे त्यांना स्वतःच्या घरातूनच बाहेर पडावे लागले. आधारासाठी त्यांनी ‘प्रतिभाश्रम’ गाठले आणि त्यानंतर ‘सखी वन स्टॉप सेंटर’मध्ये त्यांच्या प्रकरणाची नोंद झाली. समुपदेशनानंतर त्यांना पुन्हा घरी पाठवण्यात आले, मात्र काही दिवसांतच त्यांना पुन्हा घराबाहेर काढण्यात आले.
या संकटाच्या काळात त्यांनी पुन्हा सखी केंद्राचा आधार घेतला आणि घरी न परतण्याचा ठाम निर्णय घेतला. त्यांच्या पुनर्वसनासाठी २०२३ साली त्यांना ‘भाकर सेवा संस्था’च्या महिला पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले. याच ठिकाणी त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने नवे वळण मिळाले.
संस्थेत आल्यानंतर सुरभी यांनी निराशेत बुडून न जाता सेवा आणि कष्टाचा मार्ग निवडला. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची सेवा करण्याचा त्यांनी निर्धार केला. “येथील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आपलेच आई-वडील आहेत” या भावनेतून त्यांनी कामाची सुरुवात केली.
वृद्धांना अंघोळ घालणे, वेळेवर जेवण आणि औषधे देणे, स्वच्छतेची काळजी घेणे, तसेच गरज पडल्यास डॉक्टरांकडे नेणे आदी सर्व जबाबदाऱ्या त्या मनापासून पार पाडत आहेत. त्यांच्या सेवाभावी वृत्तीची दखल घेत संस्थेने त्यांची ‘काळजीवाहक’ म्हणून नियुक्ती केली असून, त्यांना योग्य मानधनही दिले जात आहे.
“ज्यांनी नाकारले त्यांच्यासाठी रडत बसण्यापेक्षा, ज्यांना आपली गरज आहे त्यांच्यासाठी जगणे हेच खरे आयुष्य,” हा संदेश सुरभी वाडेकर यांच्या प्रवासातून स्पष्टपणे दिसून येतो. एकेकाळी मदतीसाठी भटकंती करणाऱ्या सुरभी आज त्याच संस्थेत जबाबदारीने कार्य करत आहेत. त्यांच्या मायेच्या स्पर्शामुळे वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना एक प्रेमळ मुलगी मिळाली आहे. त्यांचे कार्य हे समाजातील पीडित महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

