( मंडणगड )
मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे आज पहाटे पाचच्या सुमारास नाशिकहून मंडणगडकडे येणाऱ्या वॅगनआर कारचा भीषण अपघात झाला. वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खोल खड्ड्यात पलटी झाल्याने दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
या अपघातात शंकर करमरकर (वय ५०, मुक्काम राजापूर देहेण, सध्या वास्तव्य दापोली) आणि हर्षदा जोशी (वय ७०, टिळक आळी, रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला. तर प्रमोद मुकुंद लिमये (वय ६०) आणि ओंकार प्रमोद लिमये (वय ३५), दोघेही राहणार केळशी, तालुका दापोली, हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ मंडणगड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पहाटेच्या वेळी वाहनाचा ताबा सुटून कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात कोसळल्याची प्राथमिक माहिती मंडणगड पोलिसांनी दिली आहे. अपघाताचा पुढील तपास मंडणगड पोलीस करत आहेत. या दुःखद घटनेने मंडणगड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

