(रत्नागिरी)
रत्नागिरीतील आरे समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या डोंबिवलीतील तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो जोरदार प्रवाहात वाहून गेला होता. या घटनेत निशांत राजेश ठाकरे (वय २४, रा. डोंबिवली वेस्ट, जि. ठाणे) याचा मृत्यू झाला आहे.
ही घटना ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. निशांत ठाकरे हा मित्र अंकितकुमार राकेशकुमार सिंह व इतर मित्रांसह आरे बीचवर फिरण्यासाठी आला होता. दरम्यान, पोहण्यासाठी समुद्रात उतरल्यानंतर अचानक आलेल्या जोरदार प्रवाहामुळे तो खोल पाण्यात ओढला गेला.
मित्रांनी त्याला वाचवण्याचा आणि शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. घटनेनंतर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात निशांत बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी (१२ एप्रिल) सकाळी ७.१५ वाजता काळबादेवी-फडजीवाडी परिसरातील मारुती मंदिराजवळील किनाऱ्यावर एक मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस पाटील आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर निशांतच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली.
मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
पर्यटकांसाठी आवाहन
समुद्र किनाऱ्यावर पोहताना स्थानिकांच्या सूचनांचे पालन करावे, धोकादायक प्रवाह आणि भरती-ओहोटीचा अंदाज घेऊनच पाण्यात उतरावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

