(रत्नागिरी)
जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या विषय समिती सभापतीपदांबाबतचा सस्पेन्स अखेर संपला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री उदय सामंत यांनी पाच महत्त्वाच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या सर्व नियुक्त्यांसाठी सव्वा वर्षांचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीपदांच्या निवडीची प्रक्रिया प्रशासनाने पूर्वीच जाहीर केली होती. आज (बुधवार, २५ मार्च) रोजी ही अधिकृत निवड प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात विषय समित्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. धोरणात्मक निर्णय, विविध योजनांची अंमलबजावणी आणि विभागनिहाय कामकाजावर देखरेख ठेवण्यात सभापतींची भूमिका निर्णायक असते. त्यामुळे या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार अनुभवी व अभ्यासू सदस्यांना संधी देण्यात आली आहे. त्यानुसार विलास चाळके यांची उपाध्यक्ष (बांधकाम व आरोग्य), मयुरी मिलिंद शिर्के यांची सभापती (महिला व बालकल्याण), महेश राघू नाटेकर यांची सभापती (कृषी व पशुसंवर्धन), अॅड. सुयोग नंदकुमार कांबळे यांची सभापती (समाजकल्याण) आणि नंदकुमार नारायण मुरकर यांची सभापती (अर्थ व शिक्षण) म्हणून निवड जवळपास निश्चित झाली आहे.
या नियुक्त्यांमागे पक्षांतर्गत शिस्त राखणे आणि सर्वांना कामाची संधी देणे हा प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार ही नाव निश्चित करण्यात आली आहेत. आगामी निवडणुका आणि ग्रामीण भागातील विकासकामे गतीने मार्गी लावण्यासाठी नव्या सभापतींवर मोठी जबाबदारी असणार आहे.

