(शिर्डी / वृत्तसंस्था)
गुरुपौर्णिमा 2026 निमित्त शिर्डीत सुरू असलेल्या तीन दिवसीय उत्सवात साईबाबांच्या चरणी भक्तांनी श्रद्धेची सुवर्ण उधळण केली आहे. उत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांत देशभरातील भाविकांनी साईबाबांना तब्बल 1 कोटी 70 लाख रुपयांचे सोन्याचे दान गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केले आहे. या दानामध्ये 300 ग्रॅम वजनाचा आकर्षक सोन्याचा हार, दोन सुवर्ण मुकुट आणि सुवर्ण ‘ॐ’ चिन्हांचा समावेश असून, ही माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी मुंबईतील एका साईभक्ताने आपली ओळख गुप्त ठेवत साईबाबांच्या चरणी 300 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण केला. बाजारभावानुसार या हाराची किंमत सुमारे 47 लाख रुपये असून, दुपारच्या मध्यान्ह आरतीवेळी हा सुवर्णहार साईबाबांच्या मूर्तीला परिधान करण्यात आला. संबंधित भक्ताने नाव जाहीर न करण्याची विनंती केल्याचे संस्थानने स्पष्ट केले.
उत्सवाच्या पहिल्या दिवशीही भक्तांकडून मोठ्या प्रमाणात सुवर्ण दान प्राप्त झाले. आंध्र प्रदेशातील एका साईभक्ताने 642 ग्रॅम वजनाचा नक्षीदार सुवर्ण मुकुट अर्पण केला असून त्याची अंदाजे किंमत 1 कोटी 3 लाख रुपये आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील साईभक्त ए. के. शर्मा यांनी 48 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण केला असून त्याची किंमत 6 लाख 28 हजार 752 रुपये आहे. तसेच गुजरातमधील वडोदरा येथील विजय बालकृष्ण नाईक यांनी 25.530 ग्रॅम वजनाची दोन सुवर्ण ‘ॐ’ चिन्हे अर्पण केली असून त्यांची किंमत 3 लाख 34 हजार 417 रुपये इतकी आहे.
पहिल्या दिवशी प्राप्त झालेले सुवर्ण अलंकार आणि दुसऱ्या दिवशी अर्पण करण्यात आलेला 300 ग्रॅमचा सुवर्णहार यांचा एकत्रित विचार करता, अवघ्या दोन दिवसांत साईबाबांच्या चरणी 1 कोटी 70 लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोने अर्पण झाल्याची नोंद संस्थानने केली आहे.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीत देशभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दर्शनानंतर भाविक आपल्या श्रद्धेनुसार रोख रक्कम, सोने, चांदी आणि विविध मौल्यवान वस्तू गुरुदक्षिणा म्हणून अर्पण करत आहेत. संपूर्ण शिर्डी साईनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली असून, भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसुविधांसाठी साईबाबा संस्थानकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात भक्त शिर्डीत येतात. यंदाही देशभरातून आलेल्या भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, साईबाबांप्रती असलेली श्रद्धा आणि विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

