(राजापूर / तुषार पाचलकर)
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून राजापूर पोलीस ठाणे आणि तालुका पोलीस पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आज ओणी येथील गजानन मंगल कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता पार पडलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आजच्या बदलत्या जीवनशैलीत अनेक ज्येष्ठ नागरिकांचे नातेवाईक शहरात वास्तव्यास असल्याने काहींना एकटेपणाची जाणीव होते. ही भावना दूर व्हावी, तसेच पोलीस प्रशासन त्यांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे याची जाणीव करून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवसही पोलीस प्रशासनाच्या वतीने साजरे करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचाही समावेश करण्यात आला होता. यावेळी रत्नागिरी जिल्हा न्यायाधीश पाटील यांनी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, तसेच न्यायालयामार्फत मोफत कायदेशीर मदत कशी मिळू शकते याबाबत सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी राजापूर-लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, दीपज्योती पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, मोबीन शेख, एएसआय कमलाकर पाटील तसेच पोलीस कर्मचारी, तालुक्यातील पोलीस पाटील आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

